अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- मूळचं गाव दुष्काळी त्यामुळे काम मिळविण्यासाठी वडिलांनी अगोदरच स्थलांतर केले . त्यांनी घर चालविण्यासाठी सायकल पंक्चर काढण्याचे दुकान टाकले .
आई लोकांच्या शेतात मजुरी करायची . गरिबीचे चटके ‘ ती ‘ लहानपणापासून अनुभवत होती . सुटीच्या दिवशी आईसोबत मजुरीचे काम करणाऱ्या वांगदरी गावातील प्रिया छोटूराम जाधव हिने परिस्थितीची जाण ठेवली.
विद्वत्तेच्या जोरावर यंत्र अभियांत्रिकी पदविका परीक्षेच्या निकालाआधीच पुण्यातील खासगी आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीला लागली अन आई – वडिलांच्या श्रमाचे चीज झाले .
चाळीस वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे करजोत ( ता . शहादा ) गावचे जाधव कुटुंब हाताला काम मिळावे म्हणुन वांगदरीच्या मामाच्या गावी आले तेथेच मोलमजुरी करीत स्थिरावल्यावर
दहा वर्षांनी वांगदरीत चौकात सायकल पंचर दुकान सुरु केले. छोटूराम जाधव यांना प्रिया व शिवतेज ही दोन मुले. प्रियाचे प्राथमिक शिक्षण वांगदरीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले व दहावी पर्यंतचे शिक्षण तीने शिवाजीराव नागवडे विद्यालयात घेतले.
बारावीला 80% गुण मिळाले मात्र आर्थिक अडचणींमुळे पदवीऐवजी पदवीकेला प्राधान्य देत सोनिया गांधी पॉलीटेक्निक 2019 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला.
ती सध्या पदवीकेच्या अंतिम वर्षात असताना निकालाआधीच , पुणे येथील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत ज्युनिअर इंजिनिअर या पदावर तीला नियुक्ती मिळाली आहे.ऑनलाईन मुलाखतीद्वारे तिची निवड करण्यात आली आहे.निवड झाल्याचे समजताच जाधव वस्तीवर आनंदोत्सव झाला.