अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-आराेपी बाळ बाेठे याला पकडा; अन्यथा पाेलिस अधीक्षक कार्यालयात उपाेषणाला बसण्याचा इशारा रुणाल जरे यांनी दिला आहे.यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० ला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या करण्यात आली.
पाच आराेपींना अटक करण्यात आली, परंतु मुख्य सूत्रधार बाेठे पाेलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला अटक होत नसल्यामुळे रेखा यांचा मुलगा रुणाल जरे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, बोठेचा ठावठिकाणा सापडत नाही. पोलिस यंत्रणा काय करते, असा प्रश्न पडला आहे.
पोलिस का हतबल आहेत? एलसीबीचे अधिकारी सराईत गुन्हेगारास पकडण्यास सर्व यंत्रणा कामास लावतात. मग बोठे वेगळा आहे का? पोलिस अधीक्षक व तपास अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटून विचारणा केली असता मुख्य सूत्रधार पकडण्याची हमी त्यांनी दिली नाही.
बोठे हा हायकोर्ट, सेशन्स कोर्टमध्ये त्याच्या हितचिंतकामार्फत वकिलपत्रावर सह्या पाठवतो, पण पोलिसांना तो का सापडत नाही? पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदारांना निवेदन देऊनही बोठे सापडलेला नाही. बोठेची यंत्रणा काम करते, परंतु पोलिसांची यंत्रणा कमी का पडली? पोलिस यंत्रणा सक्षम असताना डॉक्टरेट पदव्या असलेला बोठे सापडत नाही.
या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी लागणार नाही ना? बोठेला अटक होईल का? कधी होईल? कडक कारवाई होईल का? असे प्रश्न मला व माझ्या कुटुंबीयांना पडले आहेत.
त्यामुळे मला उपोषणाशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्याशिवाय माझ्या आईला न्याय मिळणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत जरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, जिल्हाधिकारी, तसेच पोलिस महासंचालकांना पाठवली आहे.