अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेत देखील माणुसकीच्या भावनेने कार्य करणार्या बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या कोविड केअर सेंटर सर्वसामान्यांसाठी वरदान ठरले.
या कोविड सेंटरला दोन महिने पुर्ण झाले असून, तब्बल 377 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती संस्थेचे संचालक फादर जॉर्ज यांनी दिली. मागील वर्षापासून बॉस्को ग्रामीण विकास केंद्र कोरोनाच्या संकटकाळात वंचित व दुर्बल घटकांना आधार देण्याचे कार्य करीत आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत सर्वसामान्यांची गरज ओळखून महापालिकेच्या सहकार्याने संस्थेच्या केडगाव येथील कार्यालयात 65 बेडचे निशुल्क कोविड केअर सेंटर एप्रिल मध्ये सुरु करण्यात आले.
सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना उपचारासाठी जागा शिल्लक नसताना, बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे कोविड सेंटर ग्रामीण भागातील नागरिकांचे आधार बनले आहे. सध्या या कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
या कोविड सेंटरमध्ये दिवसाची सुरुवात संगीतमय प्रार्थनेने होते. त्यानंतर रुग्णांना सकारात्मक माहिती देऊन निरोगी आरोग्यासाठी व्यायामाचे धडे दिले जातात. त्यानंतर नाश्ता आणि दोन वेळच्या जेवणात रुग्णांना सकस आहार दिला जातो.
दिवसातून तीन वेळा डॉक्टर रुग्णांची तपासणी करतात. रुग्णांच्या मनोरंजनासाठी कोविड सेंटरमध्ये विविध खेळाचे साहित्य देखील पुरविण्यात आले आहे. नगर-पुणे महामार्गावर केडगाव हद्दीत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले आहे.