अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- महावितरणची थकबाकी वसुली मोहीम, विजेचा खेळखंडोबा अशा अनेक समस्यांना तोंड देत असताना बळीराजावर आणखी एक मोठे संकट आले आहे.
राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक गावातील शेती पंपाच्या केबल चोरीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, लोणी बुद्रुक गावातील म्हस्के वस्ती आणि चर भागातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपाच्या केबल अज्ञातांनी चोरून नेल्याच्या घटना गेल्या आठवडाभरापासून घडल्या आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना उभ्या आणि नव्याने पेरणी केलेल्या पिकांना पाणी देण्यास अडचणी येत आहेत. लोणी बुद्रुक येथील रविकिरण नंदकिशोर राठी, ज्ञानेश्वर विठ्ठल विखे, विलास ज्ञानेश्वर विखे, गोकुळ गंगाधर विखे आदी शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपाच्या केबल अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्या.
काही केबल विहिरीत अर्धवट तुटल्या तर काही विद्युत पंपांपासून तुटल्या. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले यामुळे शेतकरी तणावात आहेत. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ दखल घेत त्या भागात जाऊन पाहणी केली. पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली.