विहिरीत पडलेल्या ‘त्या’ बिबट्यास सुखरूप बाहेर काढले

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  संगमनेर तालुक्यातील देवकौठे गावच्या शिवारात सुभाष चंद्रभान आरोटे यांच्या विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास वन विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सुखरुप बाहेर काढल्याने जीवदान मिळाले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथील आरोटे यांच्या शेतातील शंभर फुट खोल विहिरीत रात्रीच्या सुमारास मादी बिबटया विहीरीत पडला होता.

गुरूवारी सकाळी बिबटया विहिरीत असल्याचे आरोटे यांच्या लक्षात आले. त्यानंतर याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी बिबटयास विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. सदर मादी बिबट्यास निंबाळे येथील रोपवाटिकेत हलविण्यात आल्याचे वनपाल वाय. आर. डोंगरे यांनी सांगितले. बिबट्यास बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts