अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले आहेत. अत्यावश्यक सेवावगळता इतर व्यवहार बंद आहेत.
या काळात दुर्बल घटकांना शासनाने मदतीची घोषणा केली मात्र अद्यापही हो घोषणा केवळ हवेतच आहे. जिल्ह्यातील फेरीवाल्यांना अद्याप एक दमडीची मदत न मिळाल्याने, फेरीवाल्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने राज्य सरकारने १५ एप्रिल रोजी कडक निर्बंध लागू केले.
त्यामुळे व्यावसाय पुन्हा बंद करावे लागले. हातावर पोट असणाऱ्यांसाठी राज्य सरकारने सानुग्रह आनुदान देण्याची घोषणा केली.
राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे आपल्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा होतील, अशी अशा फेरीवाल्यांना होती.
मात्र, महिनाभराचा कालावधी उलटून गेला, परंतु अद्यापही फेरीवाल्यांना सरकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान राज्य सरकारने फेरीवाल्यांना १,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली खरी, पण तसा आदेश अद्याप महापालिकेला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे महापालिका स्तरावर या मदतीबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.