अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे दरदिवशी जिल्ह्यात बाधितांची भर पडते आहे. यातच जिल्ह्यातील ग्रामीण पातळीवर कोरोनाचा कहर जरा जास्तच दिसून येत आहे. नुकतेच गेल्या 24 तासात संगमनेर तालुक्यात 354 कोरोनाबाधितांची नोंद झाली.
यामुळे संगमनेर तालुक्यातील आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 21 हजारांच्या पुढे पोहचवली आहे. संगमनेर तालुक्यातील रुग्ण वाढ अतिशय चिंताजनक असून यापूर्वी जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रादुर्भाव असलेल्या अहमदनगर ग्रामीण क्षेत्रालाही तालुक्याने मागे टाकले आहे.
आजही तालुक्यातील 354 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आल्याने तालुक्याची रुग्णसंख्या आता 21 हजारांचा टप्पा ओलांडून 21 हजार 13 वर पोहोचली आहे.
दरम्यान आज जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन हजाराहून खाली आल्याने एक प्रकारे जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याचेही चित्र निर्माण झाले आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेच्या 140, खासगी प्रयोगशाळेच्या 869 व रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा समोर आलेल्या 847 अहवालांमधून जिल्ह्यातील 1 हजार 856 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे.
यात सर्वाधिक 354 रुग्ण संगमनेर तालुक्यातून समोर आले आहेत. त्याशिवाय अकोले 204, राहुरी 185, श्रीरामपूर 148, अहमदनगर महापालिका क्षेत्र 126, पारनेर व पाथर्डी प्रत्येकी 116,
नगर ग्रामीण 95 नेवासा 92 कर्जत 91 राहाता 86 श्रीगोंदा 76, कोपरगाव 69, शेवगाव 47, जामखेड 28, इतर जिल्ह्यातील 22 व भिंगार लष्करी परिसरातील एका रुग्णाचा आजच्या बाधित संख्येत समावेश आहे.