टास्क फोर्सचा राज्यातील सर्व डॉक्टर्ससमवेत रविवारी संवाद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील करणार मार्गदर्शन !

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करतांना सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत.

गेल्या काही दिवसांत त्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सशी संवाद साधला होता. उद्या रविवार १६ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मिडीयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनावर उपचार या विषयावर महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडित हे बोलणार असून हा कार्यक्रम OneMD च्या फेसबुक https://www.facebook.com/100441008205176/posts/304013491181259/

आणि यूट्यूब चॅनेलवर https://youtu.be/7dH0X0FTCpc उद्या रविवार १६ तारखेस दुपारी १२ वाजता पहावयास मिळेल.

याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोशल मिडियावरून देखील याचे प्रसारण करण्यात येईल. या ऑनलाईन कार्यक्रमात डॉक्टर्सनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोरोना लढाईला अधिक बळ देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts