तरूणाला लुटून पळाले मात्र दोघांचा बळी घेतला!

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :-एका चारचाकी वाहनातून आलेल्या तरूणांनी सावरगाव रस्त्यावर एका शाळकरी मुलाच्या गळ्यातील सोने ओरबाडून त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत त्याला मारहाण करून तिसगावकडे आलेल्या

या अज्ञात वाहनाने बसस्थानक परिसरातील एका पादचार्‍यासह दोन मोटासायकलस्वार व एका चारचाकी वाहनाला जोराची धडक दिल्याने या अपघातामध्ये दोघेजण ठार तर तिघेजण जखमी झाले.

याबाबतची अधिक माहिती अशी की,मायंबा सावरगाव रस्त्यावर शेतात चाललेल्या शाळकरी मुलाच्या गळ्यातील सोने ओरबाडुन त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत, त्याला मारहाण करून पळ काढलेले तीन ज्ञात तरुण चारचाकी वाहनातून पसार झाले. या घटनेची माहिती सावरगाव-मढी येथील ग्रामस्थांना कळताच त्यांनी या वाहनाचा शोध सुरू केला.

त्यानंतर या वाहनातील तरूण तिसगावकडे आले.येथील बसस्थानक चौकात या वाहनाने रस्त्याने पायी चाललेले रमेश साहेबराव नरवडे यांना धडक देऊन गंभीर जखमी केले. यानंतर समोरून मोटारसायकलवरून येणारे गंगाधर सूर्यभान बुधवंत, बाळू बन्सी केदार यांना जोराची धडक दिली.

यामध्ये बुधवंत राहणार शिरापूर हे गंभीर जखमी होऊन त्यात मृत्यू झाला. त्यानंतर प्रा. प्रकाश पंढरीनाथ लवांडे यांच्या चारचाकी वाहनाला धडक दिली. यामध्ये लवांडे देखील जखमी झाले. त्यानंतर दुकानाला धडक दिल्याने ते वाहन तिथेच बंद पडल्याने या वाहनातील तिघे तरुण घटनास्थळावरून पसार झाले.

सुमारे दीड तास याठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. नंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जमावाला शांत करत असतानाच एका घराच्या छतावर या अपघातातील एक आरोपी लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना समजली.

त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या रमेश नरवडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts