अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- कोरोनाच्या पार्शवभूमीवर देशात लसीकरणाचा मुद्दा हा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. लसीकरणासाठी एकच राष्ट्रीय धोरण असावे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांना राज्य सरकारने आणि त्यापुढील वयोगटातील नागरिकांना केंद्र सरकारने लस द्यायची, हे धोरण योग्य नाही.
असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी लसीकरणाच्या पुरवठ्यावरून केंद्राला झापले.
एकीकडे राज्य सरकारने 18 वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण करावे, असे सांगायचे आणि दुसरीकडे कंपन्यांना धमकावून राज्य सरकारला लस मिळणार नाही अशी व्यवस्था करायची असा प्रकार सुरू असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.
तिकडे पश्चिम बंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्यात येत आहे. 18 ते 44 वयोगटातील नागिरिकांच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो तर त्यापुढील नागरिकांच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो, देशात असा गोंधळ सुरू आहे.
असे असेल तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे फोटो लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर लावू.
लसीकरणावरून देशात हा जो गोंधळ सुरू आहे, तो योग्य नाही. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.