अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- महाराष्ट्रात पुढील दोन ते चार आठवड्यात तिसरी लाट येण्यासंबंधीचा कोणताही इशारा नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी तिसरी लाट लवकर आल्यास आपण तयार असलं पाहिजे, महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित यांनी सांगितले.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दोन ते तीन आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येत असल्याचं सांगून तुम्ही लोकांना घाबरवत आहात का? तुमच्याकडे पुरावे आहेत का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, आम्ही लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करत नाही आहोत.
मी हे योग्य पद्धतीने मांडतो. आमच्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसंबंधी चर्चा झाली. आतापर्यंतच्या मॉडेलनुसार, दोन लाटांमध्ये १०० ते १२० दिवसांचं अंतर असतं. पण हे फक्त मॉडेल असून आपल्याला खरी परिस्थिती पहावी लागते.
अंदाज लावणं कठीण अमेरिकेसारख्या देशात दोन लाटांमध्ये १४ ते १५ आठवड्यांचं अंतर आहे. पण युकेमध्ये आठ आठड्यांपेक्षा कमी अंतर आहे. आपल्याकडे डेल्टा विषाणू असल्याने तयारीत राहण्याची गरज आहे. आम्ही कधीही दोन ते चार आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं म्हटलेलं नाही. असा अंदाज लावणं कठीण आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
ते म्हणाले, आम्हाला मॉडेलप्रमाणे पुढे जात जगभरातील इतर देशांचा अभ्यास करुन इतर लाटा कशा असतील याचा अंदाज घ्यावा लागणार आहे. यासंबंधीच पूर्ण चर्चा झाली होती. लाट लवकर आल्यास आपण तयारीत राहिलं पाहिजे इतकीच चर्चा झाली असून त्यापेक्षा अधिक काही नाही.
यावेळी त्यांना मुंबईत ठिकठिकाणी लोक गर्दी करत असून सुरक्षेच्या नियमांचं पालन करत नसल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले , तिसऱ्या लाटेसाटी कोणतीही अशी वेळमर्यादा नाही. मात्र आपण सर्वांना कोरोनासंबंधित सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं पाहिजे.
आपण अर्थव्यवस्था सुरु होऊ देता कामा नये असं माझं म्हणणं नाही. पण लोकांनी घराबाहेर पडताना डबल मास्क वापरला पाहिजे.