अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकट काळात राज्यात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावत जनतेच्या हिताचे अनेक कौतुकास्पद निर्णय घेतले.
याच लोकप्रियतेचा भाजपला व त्यांच्या बोलक्या पोपटांना त्रास व्हायला लागला व एक- एक पोपट गरळ ओकत आहेत. उध्दव ठाकरे यांचे काम जनतेपर्यंत पोहचू नये म्हणून भाजप विविध खेळ्या करत आहे, असे आरोप शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी केला आहे.
पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्य पदार्थ व जीवनावश्क वस्तूंचे भाव केंद्रात सत्ता असतांना वाढवले. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून केंद्रांनीच सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली.
तरी भाजप नेते दहीहंडी आयोजित करतात. भाजप शाषित एकाही राज्यात मंदिरे उघडले नसताना महाराष्ट्रात मंदिरे उघडण्यासाठी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवून शंखनाद आंदोलन केले जाते.
जनआशिर्वाद यात्रा व आंदोलने करून राज्यात कोरोना वाढवण्याचे काम भाजप नेते करत आहेत. भाजपच्या कामाचे हिशोब मुंबई महानगरपालिकेत जनताच करेल व ह्यांची जागा यांना दाखवून देतील, असेही झावरे यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.