अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Ahmednagar News :- ज्या वक्तीने तब्बल ५५ वर्षे राजकारण आणि समाजकारणात घातली आहेत, त्यांच्यावर टीका केली की प्रसिद्धी मिळते हे विरोधकांचा माहिती आहे. शिवाय तसेच होतानाही दिसत आहे.
त्यामुळे यातून एक बोध घेता येईल की आपले (पवारांचे) नाणे या वयातही खणखणीत आहे, असा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. खासदार सुळे (Supriya Sule) आज नगरला आल्या होत्या.
त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले.
केंद्रीय सुरक्षा व्यव्यस्था घेणाऱ्या भाजपच्या नेत्यांनाही त्यांनी सुनावले, त्या म्हणाल्या, ‘काही जण केंद्रीय सुरक्षा घेत आहेत. त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.
ज्या मातीत आपण जन्मलो तेथील यंत्रणेवर आपला विश्वास नसावा, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्र पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे. देशातील हे सर्वश्रेष्ठ पोलिस दल आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवर शंका घेऊ नये.
कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची आणि गुन्ह्यांची नि:पक्षपाती चौकशी करून छडा लावण्याची त्यांची क्षमता आहे. सध्या राज्यातीलच नव्हे तर देशातील वातावरण वेगळ्याच मुदद्यांवरून दुषित केले जात आहे, हे दुर्दैवी आहे.
खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. सर्वांनी मिळून अशा बातम्या थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,’ असेही त्या म्हणाल्या.