राष्ट्रवादीमध्ये संघर्ष करणाऱ्याला मिळतो न्याय : आ. रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील आदी नेत्यांबरोबर बोलून ॲड. प्रताप ढाकणे यांना महामंडळ अथवा अन्य पदाच्या माध्यमातून सत्तेत सहभागाबद्दलचा विषय मार्गी लागेल.

यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही देत राष्ट्रवादीमध्ये जो संघर्ष करतो, त्याला न्याय मिळतो, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार चंद्रशेखर घुले, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, माजी सभापती संभाजी पालवे, काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, जिल्हा संघटनेतील बंडू बोरुडे, सीताराम बोरुडे,

बाळासाहेब ताठे, चांद मनियार, जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे आदींसह पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या आयोजनाची संपूर्ण तालुक्यात राजकीय दृष्टिकोनातून चर्चा सुरू झाली.

सत्कारमूर्ती प्रताप ढाकणे व आमदार रोहित पवार यांनी भाषणातून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख त्यांच्याविषयी सहानुभूतीच्या वक्तव्य केले. कोरोना काळात विशेष योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले.

आमदार पवार म्हणाले, नगर जिल्ह्यात ढाकणे कुटुंबाचे काम खूप चांगले आहे. संघर्षातून या कुटुंबाने कर्तृत्व फुलवले. आजपर्यंत आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली नाही. पण येत्या काळात त्यांचा संघर्ष वाया जाणार नाही, असे चित्र आहे.

गेल्या निवडणुकीत निकालाचा अंदाज येताच लोकांना भावनिक करून मतपरिवर्तन करण्याचा प्रकार घडले. प्रताप काकांनी कोरोनाच्या काळात रुग्णांची घेतलेली काळजी लक्षवेधी ठरली.

काहींनी फोटोसाठी सुरू केलेली केंद्रे लगेच बंद करावी लागली. काही केंद्रात, तर रुग्णांना फोटो पुरते बेडवर झोपवले, अशी टीका आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता केली. कोरोना बाधित होऊनही ढाकणे कुटुंबीय कोठेही थांबले नाही.

कार्यकर्त्यांनी फक्त आमदारकीवर लक्ष न देता आगामी काळात येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आदी निवडणुकांसाठी सज्ज व्हावे. राष्ट्रवादीमध्ये जो संघर्ष करतो, त्याला न्याय मिळतो.

मात्र, भाजपमध्ये अनेक ओबीसी नेत्यांनी संघर्ष केला, पक्षाची बांधणी केली. परिश्रम करून सत्ता आणली, अशा नेत्यांवर फक्त अन्याय होतो. त्यांना कोणी मोठे झालेले चालत नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांचे विषयी अप्रत्यक्षपणे सहानुभूती व्यक्त केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले, काका तुम्ही काम खूप करतात. आम्हीसुद्धा संघर्ष ढाकणे परिवाराकडून शिकलो. तुम्ही बाहेर पडा, लोकसंपर्क अधिक वाढवा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश ढाकणे,

सूत्रसंचालन विणा दिघे, उद्धव काळापहाड यांनी केले. सिद्धेश ढाकणे, योगेश रासने, देवा पवार, वैभव दहिफळे, अक्रम आतार, विनय बोरुडे यासह एकलव्य परिवाराच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts