सणासुदीच्या तोंडावर महिलांवर ओढवली सरपण गोळा करण्याची वेळ

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस दरातील वाढ सर्वसामान्य जनतेला व महिलांना डोकेदुखी ठरत आहे.

‘उज्ज्वला’ योजनेअंतर्गत केंद्र सरकारने गॅस जोडण्यांचे वितरण केले असले तरी गॅस टाकी आणण्यासाठी पैसे आणायचे कुठून? हा प्रश्न सर्वसामान्य महिलांना पडला आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर महिलांवर ओढवली सरपण गोळा करण्याची वेळ ओढवली आहे.

देशात महागाई उच्चांक गाठत आहे. सर्वसामान्य व्यक्ती महागाईच्या भडक्याने होरपळून निघाला आहे. मात्र महागाई काही केल्या कमी होताना दिसून येत नाही आहे. यातच ती काही कमी होईल असे चित्र देखील दिसत नाही आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाचे मोठे कंबरडे मोडले आहे.

दिवाळी सणाच्या आधीच सरकार गॅस, पेट्रोल, डिझेलचे दरात रोजच्या रोज भाव वाढ करून दिवाळी आधीच महागाईचे फटाके फोडत आहे. एकीकडे सर्वसामान्य जनता ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीमुळे हैराण झाली असताना त्यात ही दरवाढ अजून डोकेदुखी ठरत आहे.

सरकारने दरवाढीला ब्रेक लावावा. अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे. दरम्यान उज्ज्वला योजनेत सहभागी झालेल्या कुटुंंबातील रिकामी झालेली गॅस टाकी अनेक महिन्यांपासून घरातील कोपर्‍यात पडून असल्याचे व स्वयंपाक चुलीवर करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पूर्वी स्टोव्हसाठी अथवा चूल पेटविण्यासाठी देखील रॉकेलचा सर्रास वापर व्हायचा पण आता रॉकेल देखील उपलब्ध नाही. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करणे गृहिणींसाठी मोठे त्रासदायक काम ठरत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts