केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर दिल्लीतील सरकारी विक्री केंद्रावर ८५ रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो पुन्हा २५९ ते ३०० रुपये किलोवर गेला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दर घसरणीची शक्यता दिसत असतानाच पुन्हा दरवाढ होत आहे. राजधानी दिल्ली आणि परिसरात शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी टोमॅटोचे दर २५० रुपये किलोवर गेले होते.
छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही शंभर-दीडशे क्विंटल टोमॅटोची आवक होत आहे. भाव अडीचशे रुपये किलोपर्यंत होता. पुणे, मुंबईत १०० ते १५० रुपये दरांनी किरकोळ बाजारात टोमॅटोची विक्री सुरू आहे. संभाजीनगरसह महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्यामुळे तीव्र दरवाढ झाल्याचे दिसून येत आहे.
उपाययोजना अपयशी दिल्लीतील टोमॅटोची टंचाई, दरवाढ टाळण्यासाठी आणि दिल्लीकरांना सवलतीच्या दरात टोमॅटो मिळावा, म्हणून केंद्र सरकारने थेट टोमॅटो खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाला केंद्राने तातडीने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशतील बाजार समित्यांमधून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले होते.
नाफेड याणि एनसीसीने खरेदी केलेला टोमॅटो दिल्लीत सवलतीच्या दराने म्हणजे ८५ रुपये किलो दराने विकला जात होता; पण सवलतीच्या दराने टोमॅटोची विक्री करण्यास नाफेड आणि एनसीसीएफला अपेक्षित प्रमाणात टोमॅटो मिळला नाही.
शिवाय, थेट शेतातून खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणाही या संस्थांकडे नसल्यामुळे टोमॅटो उत्पादक भागातील बाजार समित्यांमधून खरेदी करण्यास सुरुवात केली होती; पण, आता स्थानिक बाजार समित्यांमध्येही टोमॅटोची आवक फारशी होत नसल्यामुळे केंद्र सरकारच्या उपाययोजना फोल ठरल्याचे दिसून येत आहे.
हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्ये आहेत. जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यात या प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांत मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली होती.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या होत्या. कर्नाटक, तेलगंणा, आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे टोमॅटोची आवक घटली आहे.