नवी दिल्ली : ब्रिटनचे (Britain) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (PM Boris Johnson) यांनी भारत दौऱ्यादरम्यान झालेला आनंद माध्यमांसमोर व्यक्त करत असताना अशा स्वागतामुळे सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) झाल्यासारखं वाटलं असे म्हटले आहे.
गुजरातमध्ये (Gujrat) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या समवेत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे, यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर शुक्रवारी दिल्लीत (Delhi) दोन्ही देशांच्या संरक्षण, व्यापार आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली.
यावेळी जॉन्सन यांनी गुजरातमध्ये झालेल्या भव्य स्वागताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आणि त्यांचे “खास मित्र” असे वर्णन केले. तसेच पंतप्रधान मोदींना आपला खास मित्र म्हणून संबोधित करताना ते म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील जनतेचे भव्य स्वागत केल्याबद्दल आभार मानतो.
तसेच ते म्हणाले, माझ्या आगमनानंतर ज्या प्रकारे माझे स्वागत करण्यात आले, त्यामुळे मला खूप आनंद झाला असून मला स्वतःला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) झाल्यासारखे वाटले आहे.
दरम्यान, बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींचे जोरदार कौतुक केले आहे. गुजरातमध्ये आपल्या स्वागताने तसेच अहमदाबादमधील रस्त्यांवर लावलेल्या पोस्टर्सने मी भारावून गेलो होतो असे ते म्हणाले आहेत.
यावेळी बोरिस जॉन्सन म्हणाले, गुजरातच्या लोकांनी आमचे अप्रतिम स्वागत केले. ते अगदी विलक्षण होते. इतके जंग्गी स्वागत मी कधीही पाहिले नाही. माझं असं स्वागत जगात इतरत्र कुठेही झालेली नाही. पहिल्यांदाच असं स्वागत पाहणं आश्चर्यकारक होते.