८ जानेवारी २०२५ शेवगाव : लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीला पळवून नेताना शेवगाव पोलिसांनी पाठलाग करून आरोपीस जेरबंद केले.याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अजिंक्य संजय खैरे (रा. शेवगाव) व ऋषीकेश दत्तात्रय थावरे (रा. शेवगाव) अशी या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार, आरोपी अजिंक्यने शनिवारी (४ जानेवारी) लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवर पळवून नेले.
त्यासाठी त्याला आरोपी ऋषीकेश थावरे याने मदत केली.आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक पाथर्डी हद्दीत, तसेच दुसरे पथक शिरुर (जि. बीड) हद्दीत गेले होते.मोहटादेवी रोडवरील धायतडकवाडी शिवारात पीडित मुलगी व आरोपी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन शेवगाव पोलिस ठाण्यात आणले.त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (एमएच १६, ओक्यू २१९७) जप्त करण्यात आली.