Ahmednagar: अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात काही दिवसापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणात आता श्रीगोंदेतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी मोठा निर्णय देत दिला आहे.
बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम 3 व 4 अन्वये दोन्ही आरोपींना जन्मठेप (life imprisonment)व दंडाची (Penalty)शिक्षा ठोठावली आहे. भानुदास गंगाराम भिसे (धारकरवाडी, चिंभळे) व नामदेव अंबू अडागळे चिंभळे असे आरोपींचे नाव आहे.
या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी सुनावणी दरम्यान 8 साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी, पीडित मुलगी व डॉक्टर, ग्रामसेवक, तपासी अधिकारी यांच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या . याप्रकरणी फिर्यादी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता अॅड. पुष्षा कापसे-गायके यांनी काम पाहिले.
प्रकरण काय
या खटल्यातील आरोपी भानुदास भिसे व नामदेव अडागळे या दोघांनीही दोन शेतकऱ्यांची शेती वाट्याने घेतली होती. पीडित त्याच शेतामध्ये मजुरीने कामास जात होती व तेथेच कुटुंबासह राहत होती.
फिर्याद देण्याच्या पाच महिने अगोदर पीडित घराच्या मागील उसाच्या पिकाकडे प्रातर्विधीसाठी गेली असताना तेथे आरोपी भानुदास भिसे आला व त्याने तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केला व कोणाला सांगू नको, असा दम दिला.
त्यानंतर पुन्हा पीडितेवर अत्याचार झाले. दरम्यान, फिर्यादीची मुलगी घरी एकटीच असताना दुपारी आरोपी नामदेव अडागळे यानेही बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानेही, कोणाला सांगितल्यास आईला ठार मारीन अशी धमकी दिली. दरम्यान, मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिची सोनोग्राफी केली असता ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समजले.
मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने वरीलप्रमाणे घडलेली घटना सांगितली. याप्रकरणी आरोपींना विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी फिर्याद देण्यात आली. दरम्यान, पीडित मुलीने बाळाला जन्म दिला.