अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- राज्य सरकार सर्व आघाड्यांवर फेल होत आहे. राज्य सरकारने योग्य बाजू न मांडल्याने मराठ्यांचे आरक्षण रद्द झाले.
ओबीसींच्या राजकीय आरक्षण धोक्यात आले, तसेच मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण गेले. जोपर्यंत ओबीसीचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही.
समाज त्यासाठी रस्त्यावर उतरेल, अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी केली. आघाडी सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने शनिवारी नगर-पुणे महामार्गावर सक्कर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी शिंदे यांच्यासह खासदार सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
यावेळी खासदार सुजय विखे म्हणाले की, आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलन सुरू आहे. कोरोनाच्या काळात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले.
मराठा, ओबीसींचे आरक्षण हे सरकार टिकू शकले नाही. म्हणून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. सरकारने योग्य मांडणी करून आरक्षणाबाबत ठोस पाऊल उचलले नाही तर येत्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.