Maharashtra News:सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी सतत पाऊस पडत आहे. या सततच्या पावसामुळे भाजीपाला सडत असून बाजारसमितीत येणाऱ्या भाज्यांची आवक कमी झाली आहे.
त्यामुळे भाज्यांचे भाव कडाडले असून ते दुपटीने वाढले आहेत. स्थानिक शेतकऱ्याकडून भाजीपाला येत नसल्याने परजिल्ह्यातून भाजीपाला विकत घ्यावा लागत असून त्यामुळे भाजीपाला चांगलाच महाग झाला आहे.
नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. येथील भाजीपाला इतर जिल्ह्यातही विक्रीसाठी जातो, मात्र पावसामुळे भाजी उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे.
शहरासह परिसरातील खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. मात्र काही दिवसापासून सततच्या पावसामुळे भाजीपाला सडून जात असल्याने ग्राहकांना खर्चाचा भार सहन करावा लागत आहे.
भाजीपाला व फळभाज्या कमी येत असल्याने भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांची संख्या ही कमी झाली आहे. इतर ठिकाणावरून येणारा भाजीपाला प्रवास इतर खर्च लागून येत असल्याने महाग मिळतो.
त्यामुळे भाज्यांचे दर गगनाला भिडले असुन त्यात पालक, भेंडी, सिमला मिरची ४० ते ५० रुपये किलो तर गवार ८०रुपये किलो, कोबी, ओला वाटाणा ६०रुपये किलो तर दोडका, शेवगा शेंगा, हिरवी मिरची ४० रुपये, मेथी ३९ तर कोथिंबीर देखील २० ते ३० रुपये जुडी याप्रमाणे भाजीपाला हा येथील बाजारात विकला जातो. त्यातील बराचसा भाजीपाला हा दुसऱ्या जिल्ह्यातून येत आहे.