९ ग्रामपंचायतीमध्ये विखे गटाचे सरपंच विजयी, तीन ठिकाणी चुरशीच्या निवडीत कोल्हे गटाची बाजी शिर्डी राहाता तालुक्याती १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नऊ ग्रामपंचायतीवर विजय मिळवत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांनी आपला विजयाचा झेंडा फडकवला आहे.
त्यामुळे तालुक्यात मंत्री विखे पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. राहाता तालुक्यात असणाऱ्या परंतु कोपरगाव विधानसभा कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणतांबा, वाकडी व चितळी या ग्रामपंचायतीवर कोल्हे गटाने बाजी मारत विरोधकांना पराभवाची धूळ चारली.
येथे माजी आमदार स्नेहलता कोल्हे गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले. तालुक्यातील निमगाव तसेच रुई येथे सत्ताधारी गटाला पुन्हा मतदारांनी कौल दिला असून विरोधकांच्या पदरी पुन्हा पराभव दिला आहे. गणेश परिसरातील वाकडी, पुणतांबा ही गावे विधानसभा निवडनुकीत कोपरगावला जोडली असल्याने या गावांमध्ये काळे, कोल्हे यांनी आपली शक्ती पणाला लावली होती.
विखे समर्थकही निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र वाकडी, चितळी आणि पुणतांबा गावांवर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाने बाजी मारली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाची ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.
निवडून आलेले सरपंच
धनगरवाडी गोपीनाथ खरात (विखे-काळे), कोहळे पूजा प्रमोद झिंझुर्डे (विखे गट), दुर्गापूर नानासाहेब पुलाटे (विखे गट), दहेगाव कोन्हाळे पुनम संदीप डांगे ( विखे गट), कुनकुरी संगीता गोरक्ष गोमिक्ष (विखे गट), निमगाव कोऱ्हाळे कैलास कातोरे (विखे गट), दाढ बुद्रुक तात्यासाहेब सातपुते (विखे गट),
आडगाव बुद्रुक बाबासाहेब माळी (विखे गट), रुई – शितल संदीप वाबळे (विखे गट), पिंपरी निर्मळ – पुनम विशाल कांबळे (विखे गट), पुणतांबा स्वाती पवार (कोल्हे गट), चितळी नारायण चांगदेव कदम (कोल्हे गट), वाकडी रोहिणी बाळासाहेब आहेर (कोल्हे गट) यांनी विजय मिळवला.
विखे गटाचा एकतर्फी विजय महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली धनगरवाडी, कोऱ्हाळे, दुर्गापूर दहेगाव, कनकुरी, निमगाव, दाढ बुद्रुक, आडगाव, रूई, पिंपरी निर्मळ आदी गावांमध्ये विखे समर्थकांच्या दोन गटात निवडणूक झाली. त्यामुळे ९ गावांमध्ये विखे समर्थक भाजपने बाजी मारली.