Maharashtra News:राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ठिकठिकाणी सत्कार होत आहे. आज त्यांचा संगमनेरमध्ये सत्कार झाला. हा सत्कार विशेष लक्षवेधक ठरला.
विखे पाटील यांचे पारंपरिक राजकीय विरोधक माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मतदारसंघत असलेल्या संगमनेरमध्ये विखे पाटील यांनी या निमित्ताने शक्तिप्रदर्शन केले.
मुख्य म्हणजे कार्यकर्त्यांसोबतच स्वत: विखे पाटील यांनीही घोषणाबाजी केली. जो हमसे टकरायएगा, मिट्टी मे मिल जायएगा. या त्यांनी दिलेल्या घोषणेची चर्चा रंगली आहे.
संगमनेरमध्ये थोरात यांच्या कार्यालयासमोरच हा कार्यक्रम झाला. मंत्री विखे पाटील यांची वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने त्यांना भव्य पुष्पहार घालण्यात आला.
त्यांची पेढतुला करण्यात आली. यावेळी कार्यकर्ते प्रचंड उत्साही झाले होते. यांच्या या उत्साहाला स्वत: विखे पाटील प्रोत्साह देत होते.
त्यांनी भाजपच्या विजयाच्या घोषणा दिल्या, वरिष्ठ नेत्यांच्याही घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांनी जो हमसे टकराएगा ही घोषणा देऊन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
यावेळी बोलताना विखे पाटील यांनी यापुढे संगमनेरमध्ये शत प्रतिशत भाजपसाठी सज्ज होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
नगरपालिका आणि इतरही स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपला विजय मिळवून द्यावा. त्यानंतर येणाऱ्या विधानसभेततही भाजपचा उमेदवार विजयी होईल, यासाठी आपण सर्वांनी काम करायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्रिपद आणि महसूल खाते मिळाल्यानंतर विखे पाटील यांनी थेट थोरात यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन शक्तिप्रदर्शन केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.