अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सध्या राज्यातील राजकारण पेटलेले दिसत आहे,शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
तसेच महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल, असं प्रताप सरनाईक यांनी या पत्रात नमूद केलं आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, असा बॉम्ब सरनाईक यांनी या पत्रातून टाकला आहे.
केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी काही मंत्र्यांची केंद्राशी हातमिळवणी सुरु आहे, असा आरोपही शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी या पत्रातून केला आहे
दरम्यान याबाबत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी उस्मानाबादेत पत्रकारांशी बोलताना गौप्यस्फोट केला आहे ते म्हणाले गेल्या ५ वर्षांमध्ये मी आमदार नसताना सत्तेचा गैरवापर करुन मला अशाच पद्धतीने त्रास देण्यात आला.
“शेतकरी आंदोलन प्रकरणात माझ्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात कोर्टाची नोटीस माझ्यापर्यंत आली नव्हती. नोटीस न मिळाल्यामुळे मी शेवटच्या तारखेला हजर झालो नाही.
या नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या २० ते २५ जणांच्या पोलीस पथकाने माझ्या घरावर धाड टाकली आणि मला त्रास दिला. सत्ता मिळवण्याकरता आणि राखण्यासाठी होणारे हे प्रकार दुर्दैवी असून त्यावर आळा घालणं गरजेचं असल्याचं”, गडाख यांनी बोलताना स्पष्ट केलं.
५ वर्षांपूर्वी राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार होतं. परंतू शिवसेनेची सत्ता असताना गृहमंत्री कोणाकडे होतं आणि सत्ता कोण चालवत होतं हे सर्वांना माहिती आहे.
मी इतक्या खोलात जाणार नाही पण मला या प्रकरणात खूप त्रास झाला आणि हे चुकीचं आहे असं म्हणत गडाख यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.