अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत एकत्र आहोत. जनतेसाठी काम करतो आहे. हे समोर ठेवून पुढे काम करू, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
मुंबई महापालिकेसह राज्यातील दहा महापालिकेच्या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. सगळ्यांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांत पटोले यांच्याकडून काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचा उल्लेख केला जात आहे. दुसरीकडे भाजपाही स्वबळावर निवडणूक लढवत असल्याचं सांगत आहे. यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे संकेत दिले.
यावर काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भूमिका मांडली. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी काल (१७ जून) बैठक बोलावली होती. बैठकीत स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली नाही. विधानसभा निवडणुकीला साडेतीन वर्षे वेळ आहे. जिथे पालकमंत्री आहेत, संपर्क मंत्री आहेत, तिथे फिरलं पाहिजे.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आपल्या पक्ष समोर ठेवून लक्ष केंद्रित करावे,अशी चर्चा झाल्याचं थोरात म्हणाले. एच. के. पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत काँग्रेसचे सर्व मंत्री उपस्थित होते. सरकारमध्ये आमचं काम कसं सुरू आहे, त्याचा आढावा घेण्यात आला. पालकमंत्री म्हणून काम चांगलं झालं आहे.
संपर्कमंत्र्यांनी कामाची व्याप्ती वाढवली पाहिजे अशी सूचना त्यांनी केली. काँग्रेसचे मंत्री म्हणून आमच्यावर जबाबदारी आहे, काही विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला. विधानसभा अध्यक्ष निवडणूक या अधिवेशनात होईल. अध्यक्ष कोण होईल, याबाबतच नाव तेव्हा निश्चित केलं जाईल,असं थोरात म्हणाले.
सरकार तीन पक्षांचं आहे. जे प्रश्न निर्माण झाले, त्यावर मार्ग काढतो, त्यामुळे प्रश्न सुटलेले दिसतात. पदोन्नतीतील आरक्षणाबाबत न्यायालयात प्रकरण आहे. त्यानुसार कारवाई होणार आहे.
गरीब घटकाला न्याय मिळाला पाहिजे, हा सरकारचा हेतू आहे. संजय राऊत यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्याबाबत मी भाष्य करणे योग्य नाही, असेही थोरात म्हणाले.