अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत येत्या रविवारी १४ मार्च २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
कोविड – १९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठली आहे.
युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी आयोगाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारला या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
ट्विट मध्ये सत्यजित तांबे म्हणाले… :- “एमपीएससीची परीक्षा अचनाकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो.
कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीनं अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहिजे”, अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी आयोगाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
ट्विट मध्ये आमदार रोहित पवार म्हणाले… :- “यापुढं कोरोनामुळे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे.
त्यानुसारच MPSCची परीक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री साहेब आणि अजितदादा आपण याकडं लक्ष द्यावं, ही विनंती!” असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.
संतप्त विद्यार्थी आंदोलनाच्या वाटेवर :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि शास्त्री रोडवर त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.