अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar Politics:- अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे या उड्डाणपुलाला कोणाचे नाव द्यायचे यावरूनही चर्चा आणि मागण्या सुरू झाल्या आहेत.
यावर भाजपचे खासदार डॉ. जय विखे पाटीलसु यांनी गमतीशीर टिप्पणी केली आहे. विखे पाटील म्हणाले, ‘या उड्डाणपुलासाठी अनेक महापुरुषांची नावे सूचविण्यात आहेत.
वास्तविक पाहता देशाच्या इतिहासात अनेक महापुरुषांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे कोणा एकाचे नाव पुलाला देण्यापेक्षा पुलाच्या प्रत्येक पिलरला एका महापुरूषाचे नाव देता येईल.
या पुलासाठी प्रयत्न केल्याबद्दल आणि माझ्या काळात हा पूल पूर्ण होत असल्याने माझेही नाव कोठे तरी कोपऱ्यात टाकावे,’ अशी मश्किल टिप्पणी विखे पाटील यांनी केली.
या पुलाचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हा पूल अहमदनगरसाठी आगळावेगळा आहे, तसाच उद्घाटनाचा कार्यक्रमही वेगळा आणि संस्मरणीय करण्यात येणार आहे.
या निमित्त तीन दिवस सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे. या पुलाची सजावटही आकर्षक आणि प्रबोधनात्नक करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.