अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-देशासह राज्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरु आहे. एकीकडे हे सुरु असताना मात्र दुसरीकडे लसीकरण प्रमाणपत्रावर कोणाचा फोटो हवा याचा वाद सुरु आहे.
यावर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी एक कल्पना सुचवली आहे. लसीकरणासाठी कोविन अप्लिकेशनसोबतच महाराष्ट्राचे स्वतंत्र अप्लिकेशन असावे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी तांबे यांनी उचलून धरली आहे.
मात्र, याद्वारे देण्यात येणाऱ्या लसीकरण प्रमाणपत्रावर कोणाचेच छायात्रित नसावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. ज्याचे लसीकरण झाले, फक्त त्याचेच छायाचित्र या प्रमाणपत्रावर असावे, अशी सूचनाही तांबे यांनी केली आहे. सध्या कोविन अप्लिकेशनवरून नोंदणी करण्यास अडचणी येत आहेत.
त्यावर ताण वाढला असल्याचे सांगण्यात येते. हा ताण वाढण्यासाठी त्यावरील छायाचित्राचेही कारण असावे, असे तांबे यांनी म्हटले आहे. सध्या लसीकरणानंतर संबंधितांना जे प्रमाणपत्र दिले जाते, त्यावर पंतप्रधान नरेंद मोदी यांचे छायाचित्र येते.
यापूर्वीही अनेकांनी हे छायाचित्र देण्याला हरकत घेतलेली आहे, काही नेत्यांनी यावर टीकाही केली आहे. तांबे यांनी यासंबंधी कोणाचेही नाव न घेता राज्याचे स्वतंत्र अप्लिकेशन असावे अशी सूचना करताना त्यावर लस घेतलेल्या व्यक्तीशिवाय कोणाचेही छायाचित्र असू नये.
राज्याचे स्वतंत्र अप्लिकेशन सुरू केले, तर कोविनवरील ताण कमी होईल आणि छायाचित्र कमी केले तर आणखी ताण कमी होईल, अशी अपेक्षा तांबे यांनी व्यक्त केली आहे.