अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- ग्रेसने मंगळवारी येत्या डिसेंबरपर्यंत सर्वांचे लसीकरण करण्याच्या केंद्राच्या घोषणेवर संसदेत स्पष्टीकरण मागितले. ‘मोदी सरकार डेडलाइन नव्हे, तर हेडलाइनवर चालते. या सरकारने डिसेंबरपर्यंत सर्वांचे लसीकरण करण्याच्या आपल्या धोरणावर संसदेत स्पष्टीकरण द्यावे.
त्याचा रोडमॅपही सादर करावा’, असे काँग्रेसने म्हटले आहे. ‘नागरिकांनी खासगी रुग्णालयांत लसीसाठी पैसे का मोजावे?’, असा सवालही काँग्रेसने याप्रकरणी केंद्राला केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेसने मंगळवारी त्यांच्या या घोषणेचे स्वागत करत, खासगी रुग्णालयांतही मोफत लस देण्याची मागणी केली आहे. ‘जगातील सर्वच देश आपल्या नागरिकांना मोफत लस देत आहेत. त्यामुळे आपल्या नागरिकांनी खासगी रुग्णालयांत लसीसाठी पैसे का मोजावेत?
देशातील प्रत्येकाला मोफत लस मिळावी, अशी आमची मागणी आहे’, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे. ‘केंद्राने डिसेंबरपर्यंत सर्वांना लस देण्याचे आपले धोरण संसदेत स्पष्ट करावे. तसेच त्याचा रोडमॅपही सादर करावा.
गरज भासल्यास त्यांनी लसीकरणासाठी संसदेकडून वाढीव आर्थिक तरतूदही करवून घ्यावी’, असे ते यावेळी मोदी सरकार ‘डेडलाइन’ नव्हे तर ‘हेडलाइन’ आधारित असल्याचा आरोप करताना म्हणाले. ‘लसीकरणाच्या मुद्यावर पंतप्रधान गाढ झोपेत होते. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर ते जागे झाले.
केवळ एका व्यक्तीचे अपयश व अहंकारामुळे हे सामूहिक संकट आले असून, यामुळे संपूर्ण देश त्रस्त आहे’, असे म्हणाले. ‘एप्रिलमध्ये दररोज ३० लाख लोकांना लस मिळाली. त्यानंतर मेमध्ये हा आकडा १६ लाखांवर घसरला.
त्यानंतरही सरकार डिसेंबरपर्यंत सर्वांचे लसीकरण करण्याचा दावा करत आहे. हे उद्दिष्ट गाठायचे असेल तर आपल्याला दररोज किमान ८० लाख लोकांचे लसीकरण करावे लागेल. यासाठी सरकारचे धोरण व रोडमॅप काय आहे.
लसींचा पुरवठा कुठून होणार? मोदी यावर काहीच बोलले नाहीत. केंद्राने या प्रकरणी लोकांना विश्वासात घेऊन लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न करावा’, असेही रमेश यावेळी म्हणाले.