२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेले मुळा धरण १८ हजार दशलक्ष घनफूटपर्यंत भरले असून, लवकरच हे धरण ओसंडून वाहू शकते, अशी शक्यता आहे. सध्या धरणाकडे १० हजार ७३८ क्युसेक वेगाने नवीन पाण्याची आवक सुरु आहे. ही आवक अशीच राहिली तर पुढील काही दिवसात धरण भरुन मुळा नदीत पाणी सोडण्यात येईल.
मुळा धरणाच्या कार्यक्षेत्रात पुन्हा एकदा पर्जन्यवृष्टी सुरु झाली असल्याने धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता धरणात १७ हजार ७६८ दशलक्ष घनफूट पाणी साठा झालेला होता तर १० हजार ७३८ क्युसेकने नवीन पाण्याची आवक चालू होती.
मध्यंतरी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणातील नव्याने जमा होणारा पाणीसाठा मोठा दिलासादायक ठरला आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीला धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झालेला होता. पावसाने चांगलीच ओढ दिलेली होती. त्यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण होतो की काय, अशी चिंता सतावू लागली होती.
मात्र, जुलै महिन्याच्या अखेरीस धरण पाणलोटात जोरदार पाऊस सुरु झाला अन् अवघ्या तीन ते चार दिवसात धरणातील पाणी साठा ५० टक्क्यांच्यावर पोहोचला. पुढील तीन-चार दिवसात मुळा धरणातील पाणीसाठा वीस हजार दशलक्ष घनफूटाच्या पुढे जाईल, अशी सध्याची चिन्हे आहेत. त्यामुळे धरणातून अतिक्त पाणी सोडण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे यावर्षी मुळा नदी दुथडी भरून वाहील, अशी चिन्हे आहेत.