अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-रथसप्तमीनिमित्त सावेडी येथील आनंद योग केंद्राच्या वतीने जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा करण्यात आला. सावेडी येथील शुभ मंगल कार्यालयात पहाटे सहा वाजल्यापासून योग साधकांनी सूर्य नमस्कार घालण्यास सुरुवात केली.
या उपक्रमास परिसरातील नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. आरोग्य निरोगी व सदृढ राहून जीवन आनंदी होण्यासाठी आनंद योग केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना निशुल्क योग, प्राणायामाचे धडे दिले जातात.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये योग व प्राणायामाची आवड निर्माण होण्याच्या हेतूने जागतिक सूर्य नमस्कार दिन साजरा करण्यात आला. जागतिक सूर्य नमस्कार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या उपक्रमात दोनशेपेक्षा जास्त योग साधकांनी सहभाग नोंदविला.
उपस्थितांना निरोगी आरोग्यासाठी सुर्यनमस्काराचे फायदे सांगण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी चार बॅचचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी 10 वाजे पर्यंत योग साधकांचे सूर्य नमस्कार सुरु होते. या उपक्रमासाठी योग केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप कटारिया यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकारी योगशिक्षक अंजली गांधी, चंद्रशेखर सप्तर्षी,
बबन वाघ यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमात आर्चरी प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. नागरिकांमध्ये योग, प्राणायामाची आवड निर्माण होण्यासाठी आनंद योग केंद्राच्या वतीने प्रचार व प्रसार सुरु आहे.
केंद्राच्या वतीने निशुल्क ओंकार वर्ग, उंची संवर्धन, योग सराव, सूर्य नमस्कार, योग ओळख, योग प्रगत वर्ग नियमीत सुरु असल्याची माहिती केंद्रप्रमुख दिलीप कटारिया यांनी दिली.