Science News : दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलसारख्या पारंपरिक ऊर्जा साठ्यांचा वापर वाढत आहे. त्यामुळे हे नैसर्गिक साठे आटत चालले आहेत, म्हणूनच गेली अनेक वर्षे जगभरातील शास्त्रज्ञ पर्यायी ऊर्जानिर्मितीचे प्रयोग करीत आहेत.
ही ऊर्जा परवडण्याजोगी असावी आणि ती पर्यावरण स्नेहीदेखील असावी, या दिशेने शास्त्रज्ञ निरंतर प्रयत्न करीत आहे. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना या प्रयत्नामध्ये दुसऱ्यांदा यश लाभले आहे. या प्रयोगामुळे सूर्यासारखी प्रचंड ऊर्जा पृथ्वीवर निर्माण करणे भविष्यात शक्य होऊ शकेल. त्यामुळे हा प्रयोग अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या शास्त्रज्ञांनी पर्यावरणस्नेही आणि सूर्यासारखी निरंतर प्राप्त होणारी स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यासाठी न्युक्लिअर फ्यूजन या तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग केला आहे. गेल्या डिसेंबर महिन्यापासून दुसऱ्यांदा अशाप्रकारे वैज्ञानिकांना या सर्वात स्वच्छ ऊर्जास्त्रोताच्या निर्मितीमध्ये यश आले आहे, अशी माहिती ‘लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरी’ ने दिली आहे.
कॅलिफोर्नियामधील लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीच्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी ३० जुलै रोजी ‘नॅशनल इग्निशन फॅसिलिटी’ येथे ‘फ्यूजन इग्निशन’ ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून ऊर्जानिर्मिती केली. डिसेंबर महिन्यात करण्यात आलेल्या अशा पहिल्या प्रयोगाच्या तुलनेत या दुसऱ्या प्रयोगामध्ये अधिक प्रमाणात ऊर्जा उत्पन्न करण्यात यश आल्याची माहिती लॉरेन्स लिव्हरमोरच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
या संशोधनाच्या अंतिम अहवालावर काम सुरू असल्याचेही प्रवक्त्यांनी सांगितले. न्यूक्लियर फ्यूजनमध्ये दोन अणू केंद्रके म्हणजेच (अॅटॉमिक न्यूक्लीअस) एकत्र करून एक जड अणू केंद्रक (न्यूक्लीअस) तयार केला जातो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचंड ऊर्जा बाहेर फेकली जाते.