Overhydration : आपल्या जीवनात पाण्याला खूप महत्वाचे स्थान आहे, अन्नाशिवाय आपण एक दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय जगणे कठीण आहे. मानवी शरीरात सुमारे 70 टक्के पाणी असते. पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते असे मानले जाते. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, पण कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन आपल्या आरोग्यसाठी नुकसानीचे ठरू शकते हे तुम्हाला माहितच असेल, तसेच जर आपण जास्त प्रमाणात पाणी प्यायलो तर ते देखील आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
नुकतेच अमेरिकेत एका 35 वर्षीय महिलेचा अति पाणी पिल्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ती महिला 4 जुलै रोजी तिच्या कुटुंबासह सुट्टीवर गेली होती. यादरम्यान तिला खूप तहान लागली आणि तिने 20 मिनिटांत सुमारे चार बाटल्या पाणी पिले, त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी महिलेच्या मृत्यूचे कारण वॉटर टॉक्सिसिटी असल्याचे सांगितले. दरम्यान, आजच्या या लेखात आपण जास्त पिण्याचे नुकसान जाणून घेणार आहोत…
जास्त पाणी पिण्याचे नुकसान :-
पाण्याच्या विषारीपणाला वैद्यकीय भाषेत हायपोनेट्रेमिया म्हणतात. जेव्हा तुम्ही कमी कालावधीत जास्त पाणी पितात तेव्हा ही समस्या उद्भवते. अशावेळी किडनीमध्ये जास्त पाणी साचते. वास्तविक, जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी असंतुलित होते, याला पाण्याचा विषारीपणा असे म्हणतात. शरीराच्या कार्यासाठी सोडियम आवश्यक आहे. हे शरीराच्या पेशींच्या आत आणि बाहेरील द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यास मदत करते.
पाण्याच्या विषारीपणाची लक्षणे ओळखणे फार महत्वाचे आहे. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये तुम्हाला सामान्यतः अस्वस्थ वाटू शकते. मळमळ, स्नायू पेटके, डोकेदुखी अशी लक्षणे जाणवू शकतात, जर ही लक्षणे तुमच्या शरीरात झपाट्याने वाढत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
-कमी कालावधीत जास्त पाणी पिल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. तथापि, पाण्यात विषबाधा होण्याची इतर कारणे असू शकतात.
-ज्यामध्ये आरोग्याच्या समस्या, औषधे आणि जीवनशैलीशी निगडीत अस्वस्थ सवयींमुळेही ही समस्या उद्भवू शकते.
-तसेच, उन्हात बाहेर पडल्यानंतर लगेच जास्त पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. यामुळे पाण्याच्या विषारीपणाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पाणी हळू हळू पिणे कधीही चांगले.
पाण्याची विषबाधा कशी टाळायची ?
उन्हाळ्यात लोकांना खूप तहान लागते. अशा परिस्थितीत ते आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पितात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. कमी वेळात जास्त पाणी पिणे धोकादायक ठरू शकते.