Ajab Gajab News : जगभरातील संशोधक विविध वन्यजीवांच्या प्रजनन प्रक्रियेचा अभ्यास करून सृष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशाचप्रकारे युरोपीयन बेडकांवर झालेल्या मनोरंजक संशोधनातून मादी बेडकांना नेहमीच वीण करण्यात
रस नसल्याचे समोर आले असून अशा अनैच्छिक संभोगापासून दूर राहण्यासाठी तसेच नर बेडकांपासून स्वतःच्या बचावासाठी मादी बेडूक चक्क मरण्याचे ढोंग करत आल्याचे समोर आले आहे.
बेडकांच्या प्रजनावर केलेल्या अभ्यासात शास्त्रज्ञांना आढळून आले आहे की, मादी बेडकांनी नर बेडकांपासून सुटण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे. लॅबंगर इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्युशन अँड बायोडायव्हर्सिटी सायन्सच्या संशोधकांनी युरोपियन सामान्य बेडकांच्या वीणीचा अभ्यास केला
असून त्यात मादी नराची सोबत करण्याचे टाळण्यासाठी मृतावस्थेत असल्याचा आव आणतानाच विशेष आवाज काढते, त्यामुळे नर बेडूक तिच्यापासून दूरच राहतात. युरोपियन सामान्य बेडकांचे पुनरुत्पादन खूप वेगळे असते,
कारण त्यांचा प्रजनन कालावधी कमी असतो. ते सहसा तलावात मोठ्या संख्येने एकत्र येतात. त्यांच्यात नर बेडकांची संख्या माद्यांपेक्षा जास्त असल्याने नर बेडकांच्या अतिरेकीमुळे मादी बेडकांचा मृत्यूही होतो.
अशा जीवघेण्या परिस्थितीत मादी बेडूक विशिष्ट मोठा आवाज करणे आणि हालचाल न करता मृतावस्थेचा भास निर्माण करत असल्याचे संशोधकांनी या अभ्यासात नमूद केले आहे. संशोधकांनी वीणीच्या हंगामात तलावांमधून गोळा केलेल्या नर आणि मादी युरोपियन सामान्य बेडकांवर लक्ष केंद्रित करत त्यांचा केला.
त्यात अर्ध्या मादी बेडकांनी वीण टाळण्यासाठी गुरगुरणे किंवा किंचाळण्यासारखे आवाज काढणे सुरू केले. त्याचवेळी एक तृतीयांश माद्यांनी दोन मिनिटे हालचाल थांबवून मरताना दिसण्याचे तंत्र अवलंबले, जेणेकरून नर बेडूक मादी मेली असे समजून दूर जात असल्याचे संशोधकांना या अभ्यासात आढळून आले.