Smoking : सिगारेट, विडी, चिरूट आदी धूम्रपानाची साधने जगभरात कुप्रसिद्ध आहेत. तंबाखु जाळून त्याचा धूर ओढण्यामुळे म्हणजेच धूम्रपान करण्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवतात.
विशेषतः धूम्रपान हे कॅन्सर होण्याचे एक प्रमुख कारण आहे, हेदेखील सर्वज्ञात आहे. त्यामुळेच धूम्रपानाला आळा घालण्यासाठी देशोदेशीची सरकारे अनेकविध बंधने लादत असतात.
पण तुम्हाला माहीत आहे का की, एक असाही देश आहे की, ज्या देशात धूम्रपानाच्या व्यसनाने कहर माजवला आहे. या देशातील तब्बल ६० टक्के जनता धूम्रपानाच्या व्यसनाच्या आहारी गेलेली आहे.
परिस्थिती एवढी गंभीर आहे की, या देशात अवघ्या तीन-चार वर्षांच्या वयातील निरागस मुले आपल्या माता-पित्यांच्या समोर धूम्रपान करतात.हा देश आहे इंडोनेशिया. या देशात अत्यंत कमी म्हणजे कोवळ्या वयात मुलांना धूम्रपानाचे व्यसन लागत असल्याचे दिसून आले आहे.
येथील काही मुले तर दिवसाकाठी सिगारेटची दोन पाकिटेही फुंकून टाकतात. हे वास्तव अत्यंत भयावह आहे. इंडोनेशियामधील कोवळ्या वयातील मुलांच्या धूम्रपानाच्या व्यसनाला सर्वप्रथम कॅनडाच्या एका फोटोग्राफरने वाचा फोडली.
मिशेली सीयू नावाच्या या फोटोग्राफर महिलेने हा देश धूम्रपानाच्या कसा आणि कितपत आहारी गेला आहे, हे जगासमोर मांडले. मिशेलीने टिपलेल्या छायाचित्रांमध्ये अगदी तीन-चार वर्षांची मुले आपल्या आई-वडिलांच्या मांडीवर बसून खुशाल धूम्रपान करताना दिसली.
संतापाची बाब म्हणजे एवढ्या कोवळ्या वयात मूल धूम्रपान करत असल्याचे पाहून त्याच्या माता-पित्याला काहीच वावगे वाटत नाही.