India News : आपला शेजारी देश भारत चंद्रावर पोहोचला आहे अन् पाकिस्तान जगापुढे पैशाची भीक मागत आहे, अशा शब्दांत माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी देशाची हतबल परिस्थिती मंगळवारी अधोरेखित केली.
भारताने जी- २० शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केले. पण, याच वेळी पाकिस्तान मात्र आर्थिक घोटाळ्यांमध्ये अडकला आहे. या दुर्दशेसाठी माजी लष्करप्रमुख व न्यायाधीश जबाबदार असल्याचा आरोप शरीफ यांनी केला.
‘पाकिस्तान मुस्लिम लीग-एन’ पक्षाचे सर्वेसर्वा नवाज शरीफ यांनी लाहोर येथे आयोजित पक्षाच्या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, पाकिस्तानची अर्थव्यवस्था मागील अनेक वर्षांपासून डबघाईला आली आहे.
त्यामुळे महागाईचा आकडा दुपटीने वाढला असून यात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. अशा बिकट परिस्थितीत पाकचे पंतप्रधान देशोदेशी जाऊन निधीची भीक मागत आहेत. अन् याचवेळी भारताने चंद्रावर जाण्याची किमया साध्य केली आहे, असे ते म्हणाले.
भारताने जे पराक्रम केले ते पाकिस्तान का करू शकला नाही? याला जबाबदार कोण ? असा सवालही शरीफांनी उपस्थित केला. अटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्याकडे फक्त एक अब्ज डॉलर्सची परकीय गंगाजळी होती.
हाच आकडा आता ६०० अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचला आहे. आज भारत कुठे पोहोचला आहे आणि पाकिस्तान भीक मागायला मागे राहिला आहे, असा आरसा नवाज शरीफ यांनी पाकच्या राज्यकर्त्यांना दाखवला आहे