IRCTC : भारतीय रेल्वेच्या अशा अनेक सुविधा आहेत ज्यांची माहिती दररोज प्रवास करणाऱ्या कित्येक प्रवाशांना माहिती नसते. यापैकी एक म्हणजे विमा संरक्षण. रेल्वेचे तिकिट बूक करत असताना आपण फक्त तिकिट कन्फर्म झालं की नाही हे पाहतो.
परंतु अनेकांना हे माहित नाही की रेल्वे तिकिट काढत असताना विमा काढण्याचा पर्याय देण्यात येतो. तुम्हाला फक्त 35 पैशांत 10 लाखांपर्यंत नुकसान भरपाई मिळते. जर तुम्हीही विमा घ्यायला विसरला असाल तर लगेच या सुविधेचा लाभ घ्या.
पर्याय उपलब्ध
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोक रेल्वेचा प्रवास अधिक चांगला मानतात. त्याशिवाय रेल्वेच्या प्रवास करण्याचेही खूप फायदे आहेत. तुम्हाला आता डिजिटायझेशनच्या युगात तिकीट काउंटरवर वेळ न घालवता घरबसल्या ऑनलाइन तिकीट बुक करता येऊ शकते. यात तुम्हाला तुमची सीट निवडण्यापासून ते प्रवासादरम्यान खाण्यापिण्याचा पर्याय देण्यात येतो.
तसेच तिकीट बुक करत असताना तुम्हाला विमा घेण्याचा पर्याय देण्यात येतो, ज्याद्वारे प्रवासादरम्यान कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत झालेल्या नुकसानीसह जीवित आणि मालमत्तेचे नुकसान कव्हर करण्यात येते.
सर्वात स्वस्त विमा
IRCTC केवळ 35 पैशांच्या जवळपास शून्य प्रीमियमवर रेल्वेमधून प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देत आहे. जरी हा पर्याय ऐच्छिक असला तरी प्रवाशांसाठी हा सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम विमा संरक्षण असू शकतो.
ज्यावेळी तुम्ही तुमचे रेल्वे तिकीट IRCTC वेबसाइटवरून बुक करता त्यावेळी तुम्हाला पेमेंट प्रक्रियेदरम्यान प्रवास विम्याचा पर्याय मिळतो. तुम्ही तो पर्याय निवडला तर, तुम्हाला हे विमा संरक्षण फक्त 35 पैशांमध्ये मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व प्रवाशांना लागू होते ज्यांचे तिकीट एका PNR द्वारे बुक केले आहे.
यावेळी मिळते विमा संरक्षण
भारतीय रेल्वे आणि पर्यटन महामंडळाच्या वेबसाइटनुसार तुम्हाला आता फक्त 35 पैसे खर्च करून हा विमा काढता येऊ शकतो. या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या विमा संरक्षणामध्ये कायमचे आंशिक अपंगत्व, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व तसेच दुखापत किंवा गंभीर दुखापतींमुळे रुग्णालयात दाखल करण्यासाठी वाहतूक खर्च आणि प्रवासादरम्यान मृत्यू यांचा समावेश होतो. तसेच ते विविध श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहे.
दुखापतीसाठी 2 लाख आणि मृत्यूसाठी 10 लाख रुपये
दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल झाले तर, त्याला 2 लाख रुपयांचे संरक्षण देण्यात येते. कायमस्वरूपी आंशिक अपंगत्वासाठी 7.5 लाख रुपयांचे संरक्षण दिले जाते. समजा अपघातात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला तर त्याच्या पार्थिवाच्या वाहतुकीसाठी 10,000 रुपये आणि मृत्यू झाला किंवा कायमचे अपंगत्व आले तर 10 लाख रुपयांचे संरक्षण दिले जाते.