लाईफस्टाईल

Spices Rate : आता हेच राहिले होते ! मसाल्याच्या पदार्थांच्या दरात मोठी वाढ

Spices Rate :  सर्वसामान्यांच्या जेवणातील, खासकरून आगामी सणासुदीच्या दिवसांत ती चव बिघडणार असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. वेलची, सुंठ, काळी मिरी, शाहजिरा या पदार्थांच्या दरात गेल्या काही दिवसांत मोठी म्हणजे प्रतिकिलो सुमारे १०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

वेलची मुखवास म्हणून वापरली जाते, तशीच ती मसाल्याचा भाग म्हणून आहारातही उपयोगात आणली जाते. गोड पदार्थांतही तिचा आवर्जून वापर केला जातो. केरळ आणि तामिळनाडू येथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वेलचीची आवक होते.

साधारणतः १५ दिवसांपूर्वी लहान वेलचीचा नवी मुंबई घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर २१०० ते २४०० रुपये प्रतिकिलो एवढा होता. तो आता २४०० ते २७०० रुपये प्रतिकिलोवर गेला आहे. ही ३०० रुपयांची भाववाढ अनाकलीय असल्याचे मत येथील व्यापारी व्यक्त करीत आहेत.

काळी मिरी आणि शाहजिरा या दोन्हींच्या दरातही प्रतिकिलो १०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून, गेल्या सहा महिन्यांत सुंठीच्या दराने दुपटीने उडी मारली आहे. सध्या सुंठीचा दर ४०० रुपये किलो आहे.

मसाल्याच्या या पदार्थांचे रोजच्या आहारातील प्रमाण कमी असले, तरी ते पूर्णतः वगळता येत नाहीत. त्यामुळे या भाववाढीचाही फटका सामान्यांच्या अंदाजपत्रकाला बसत आहे.

केरळ, राजस्थान आंध्र प्रदेशातील काही भागातून मसाल्याच्या पदार्थांची मोठ्या प्रमाणावर आवक असते. एप्रिल मे महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस राजस्थानच्या भागात पिपरजॉय चक्रीवादळ याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.

सध्या पावसाळा सुरू असून, त्यानंतर सुरू होणाऱ्या सणसमारंभामुळे बाजारात गर्दी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या बाजारात मसाल्याचे दर वाढलेले आहेत.

                           महिन्याभरापूर्वी                आता

वेलची                  २१०० ते २४००            २४०० ते २७००
काळीमिरी            ४०० ते ५००               ६०० ते ८००
सुंठ                     २५० ते २७०               ४०० ते ४२०
वेलदोडे               २६०० ते २७००            २८०० ते २९००
लवंग                   ५०० ते ८५०               ६०० ते ९००
तेजपत्ता               १२० ते १५०                 १५० ते २००

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Spices Rate

Recent Posts