Side Effects Of Drinking Less Water During Winter : हळूहळू थंडी वाढू लागली आहे, अशास्थित आपल्या जीवनशैलीत आणि आहारात अनेक गोष्टी बदलू लागतात. तसेच या मोसमात आपले पाणी पिणे देखील कमी होते. हिवाळ्यात बरेच लोक कमी प्रमाणात पाणी पितात. हिवाळ्यात तहान कमी लागते, म्हणून लोक कमी पाणी पितात. पण हिवाळ्यात कमी पिणे आपल्या आरोग्यसाठी हानिकारक ठरू शकते.
जसे उन्हाळ्यात कमी पाणी पिल्याने डिहायड्रेशन, कमी ऊर्जा आणि थकवा यासारख्या अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. तसेच हिवाळ्यात देखील अशा समस्या उद्भवू शकतात. पण लोकं याकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच आज आपण हिवाळ्यात कमी पाणी पिण्याचे शरीरावर काय परिणाम होतात हे जाणून घेणार आहोत.
एका दिवसात आपण किती पाणी प्यावे?
इतर कोणत्याही ऋतूप्रमाणे, हिवाळ्यातही हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे. तथापि, एखाद्या व्यक्तीने किती पाणी प्यावे हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. असे असूनही, सामान्य मार्गदर्शक तत्त्वानुसार, प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान 8 ग्लास (सुमारे 2 लिटर) पाणी प्यावे. परंतु, हे त्या व्यक्तीचे वय, शारीरिक हालचालींची पातळी आणि तुम्हाला एका दिवसात पाणी पिण्याची गरज असलेल्या हवामानावर देखील अवलंबून असते. त्यामुळे तहान लागल्यास लगेच पाणी प्या.
हिवाळ्यात कमी पाणी पिण्याचे दुष्परिणाम :-
-हिवाळ्यात हवा कोरडी होते, त्यामुळे उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात लोक कमी पाणी पितात. परिणामी, शरीर निर्जलीकरण होते. त्यामुळे अनेकदा घसा कोरडा राहतो आणि लघवी कमी होते. अशास्थितीत तुम्हाला चक्कर येणे, गोंधळ होणे आणि काही प्रकरणांमध्ये बेशुद्ध होणे यासारख्या समस्या दिसतात.
-पुरेसे पाणी न पिल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे संपूर्ण शरीर कमकुवत होते, त्यामुळे संसर्ग आणि फ्लूचा धोका वाढतो.
-कमी पाणी प्यायल्याने त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्वचा कोरडी होते, त्यामुळे त्वचेला खाज सुटते आणि काही वेळा त्वचेतून बाहेरचा थर निघू लागतो.
-हिवाळ्यात ओठ फाटणे ही एक सामान्य समस्या बनते. याचे एक कारण पुरेसे पाणी न पिणे हे आहे. जर तुम्ही तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवले नाही तर ओठांची आर्द्रता कमी होते, ज्यामुळे अशा समस्या वाढतात.
-जेव्हा एखादी व्यक्ती कमी पाणी पिते तेव्हा लघवीची वारंवारता देखील कमी होते. जेव्हा एखादी व्यक्ती कमी लघवी करते तेव्हा शरीरात खनिजे आणि क्षार जमा होऊ लागतात, जे कालांतराने किडनी स्टोनचे रूप घेतात. म्हणून हिवाळ्यात देखील योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.
-बॉडी हायड्रेशन हे शरीराच्या सांध्यांसाठीही महत्त्वाचे मानले जाते. अपुऱ्या पाण्यामुळे सांधे जड होऊ शकतात, त्यामुळे थंडी वाढली की दुखण्याची समस्या सुरू होते.
-पाण्याच्या कमतरतेमुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
-तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे की जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी प्यायले तर त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. अनेक वेळा कमी पाण्यामुळे एकाग्रता कमी होते आणि गोष्टी लक्षात ठेवण्यास त्रास होतो.