Ayushman Bharat Golden Card : केंद्र व राज्य सरकराने आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरीकांना आरोग्यासंबधी उपचार मोफत मिळावेत, यासाठी पांढरे रेशनकार्ड वगळता सर्व नागरिकांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना एकत्रीत प्रती वर्षी प्रति कुटुंब पाच लाख रुपयापर्यंतची वैद्यकीय उपचार विमा योजना मोफत सुरु केली आहे.
तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक डॉ. जगदिश पालवे यांनी केले आहे.
आयुष्मान भारत या योजनेची माहिती देताना ते पत्रकारांशी बोलत होते. भारत सरकार व राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी आयुष्यमान भारत ही योजना आहे. पात्र लाभार्थ्यांना आरोग्य विषय शस्त्रक्रियांवर पाच लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत केला जाणार आहे.
१ सप्टेंबरपासून योजनेचा प्रारंभ झाला आहे. हे गोल्डन कार्ड काढण्यासाठी सेतू कार्यालये, आशा स्वयंसेविका यांच्याकडे आधारकार्ड, रेशनकार्ड व लिंक असलेला मोबाईल नंबर देऊन कार्ड काढता येते. मोबाईल वरुन देखील हे कार्ड काढुन डाऊनलोड करु शकता. याचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घेतला पाहीजे, असे पालवे यांनी सांगितले.
पाथर्डी तालुक्यात आतापर्यंत ३१४३९ लोकांनी हे आयुष्यमान भारतचे गोल्डन कार्ड काढले आहे. तालुक्यात १,६५,९३८ लोकांचे गोल्डन कार्ड काढण्याचे उद्धिष्ट आहे. सर्व आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कार्यालये,
सेतु कार्यालये येथे हे काम सुरु आहे. गावागावात कॅम्प आयोजित करुन हे गोल्डन कार्ड काढले जात आहे. नागरीकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. जगदिश पालवे यांनी केले आहे.