Viral News : सौंदर्यनगरी, जगाची फॅशन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसची झोप सध्या खराब झाली आहे. एका निशाचर, रक्तशोषक कीटकाने गेल्या काही काळापासून या महानगरीला वेठीस धरले आहे. तो कीटक आहे ढेकूण.
तांबूस तपकिरी रंगाचा, लांबट वर्तुळाकार आणि पसरट असा हा जास्तीत जास्त ४-५ मिलीमीटर लांबीचा कीटक. उंदीर, ससे, गिनीपिग, घोडे, कोंबड्या यांचे रक्त हा त्याचा आहार. माणसाचे रक्त ही बहुधा त्याची सर्वात आवडती डिश असावी.
एकदा डिनर झाले की, या रक्तपिपासूचे काम भागते. लगेच तो लपून बसून अन्नपचनाच्या कार्याला लागतो. तसे अन्नाशिवाय तीन-तीन महिने जगण्याचीही त्याची क्षमता असते. तोवर तो लपून बसू शकतो.
गाद्या, उशा, कपाटे, फर्निचर, भिंती यांच्या फटी हे त्याचे वसतिस्थान. तेथे दबा धरून बसलेले असतात ते. माणसाच्या शरीराचे तापमान आणि त्याच्या बसण्याचा दाब हे दोन संकेत त्याला पुरेसे असतात. ते मिळताच तो धावा बोलतो.
तसा त्याने गेल्या काही वर्षांपासूनच पॅरिसमध्ये धुमाकूळ घातला आहे. आता मात्र परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली आहे. घराघरांत, चित्रपटगृहांत, रुग्णालयांत, ट्रेनमध्ये सगळीकडे हे रक्तपिपासू पसरले आहे.
तेथे लोकांना सुखाने बसताही येत नाही अशी परिस्थिती आहे. पॅरिसचे उपमहापौर इमॅन्युएल ग्रेगोरी यांनी थेट पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांना पत्र लिहून, शहराला या संकटापासून वाचवा, असे साकडे घातले आहे.
ढेकूण ही एक सार्वजनिक आरोग्य समस्या आहे आणि तिच्याकडे तसेच पाहिले पाहिजे. २०२४ मध्ये देशात ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा होत आहेत. त्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने सर्व संबंधितांना एकत्र आणून यावर योग्य तो कृती कार्यक्रम तयार केला पाहिजे, असे आवाहन ग्रेगोरी यांनी या पत्रातून केले आहे.
ही समस्या एवढी गंभीर बनलेली आहे की, आता गृहविम्यामध्ये या ढेकणांविरुद्धच्या उपायांचाही समावेश करायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे. ही समस्या एवढी मोठी का झाली? फ्रान्स सरकारच्या मते आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक आणि विद्यमान कीटकनाशकांचा ढेकणांवर न होणारा परिणाम यामुळे त्यांची संख्या वाढलेली आहे.