Ajab Gajab News : फ्लोरिडातील एका दाम्पत्याच्या आयुष्यातील हा योगायोग म्हणायचा की चमत्कार, परंतु त्यांना गेल्या ३ सप्टेंबरला तिसरी मुलगी झाली! यातील योगायोगाची बाब ही की, यापूर्वीही त्यांना दोन मुली झाल्या होत्या आणि त्या दोघीचा वाढदिवसही ३ सप्टेंबर हाच आहे.
काही वर्षांच्या अंतराने परंतु नेमक्या एकाच तारखेला अशा प्रकारे एखाद्या दाम्पत्याला अपत्य होण्याची घटना यापूर्वी कधी पाहिली नाही, ना कुठे ऐकली, अशी प्रतिक्रिया यावर ओकाला येथील अॅडव्हेन्ट हेल्थ हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे.
सौहरी टर्नर (२६) आणि जेरेमी टर्नर (३३) असे या मुलींच्या आई-वडिलांचे नाव आहे. अमेरिकेतील ‘ फॉक्स न्यूज डिजिटल शी बोलताना रुग्णालयाच्या महिला आणि बाल विभागाच्या सहाय्यक उपाध्यक्ष सिंडी पॉयरिएर यांनी सांगितले की, टर्नर दाम्पत्याचे चार वर्षांतील हे तिसरे अपत्य.
ते जेव्हा आधीच्या मुलीप्रमाणेच ३ सप्टेंबरला जन्मास आले, तेव्हा आम्ही त्याचा सोहळाच साजरा केला. अशा प्रकारची दुर्मीळ आणि सनसनाटी घटना आपल्याला आठवण करून देते की जीवन हे जादूमय असते.
त्या मुलींची माता सौहरी टर्नर हिने सांगितले की, यानंतर लोक मला विचारतात की तुमच्यावर सी-सेक्शन शस्त्रक्रिया करण्यात आली होती का? पण तसे नाही. माझ्या तिन्ही मुलींचा जन्म नैसर्गिक पद्धतीनेच झाला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी १८ डिसेंबरला अमेरिकेतील अलाबामा राज्यातील हंट्सविल येथे अशीच एक अनोखी घटना घडली होती. त्या दिवशी कॉसेंडी आणि डिलन स्कॉट या दाम्पत्याने एका मुलीला जन्म दिला होती.
त्यात विशेष बाब अशी की, माता, पिता आणि ती नवजात कन्या यांची जन्मतारीख एकच होती. ही अशी घटना एक ३३ हजारांत एक अशा प्रकारची असल्याचे हंट्सविल हॉस्पिटलतर्फे सांगण्यात आले.