लाईफस्टाईल

आकाशातून रहस्यमयरीत्या अदृश्य झाले तीन तारे ! रहस्य अजूनही नाही उलगडले…

Marathi News : खगोलशास्त्रीय जगात एकापेक्षा एक रहस्य आहेत, असेच एक रहस्य आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांविषयी समोर आले आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये काही खगोलशास्त्रज्ञ आकाशाचे फोटो काढत असताना त्यांच्या कॅमेऱ्यात तीन चमकणारे तारे कैद झाले.

मात्र, काही वेळानंतर त्यांनी पुन्हा फोटोग्राफी केली, तेव्हा ते तारे रहस्यमयरीत्या गायब झाले होते. मात्र त्यामागील रहस्य ते अजूनही उलगडू शकलेले नाहीत.

तारे आणि ताऱ्यांचे जग रहस्यांनी भरलेले असून यातील काही रहस्ये खगोलशास्त्रज्ञांनाही थक्क करणारी आहेत. सुमारे ७१ वर्षांपूर्वी म्हणजेच जुलै १९५२ मध्ये, पालोमर खगोलशास्त्रीय संशोधनातील शास्त्रज्ञ लघुग्रह आणि इतर खगोलीय पिंडांची माहिती मिळवण्यासाठी आकाशाचे फोटो काढत असताना त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

कारण काही वेळापूर्वीच दिसलेले आकाशातील तीन तारे अचानक अदृश्य झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जुलै १९५२ च्या त्या रात्री सुमारे ८.५२ च्या सुमारास फोटोग्राफिक प्लेटवर तीन ताऱ्यांची उपस्थिती नोंदवली गेली.

ते तीन तारे एकमेकांच्या जवळ होते आणि त्यांची चमकही थोडी जास्त होती. पण अवघ्या ५३ मिनिटांनंतर म्हणजेच ९.४५ च्या सुमारास जेव्हा आकाशाच्या त्याच भागाचे पुन्हा छायाचित्रण केले गेले, तेव्हा ते तीनही तारे गायब होते आणि ते कसे गायब झाले, याचा कोणताही पुरावा सापडला नाही.

एका रिपोर्टनुसार, त्या ताऱ्यांचा स्फोट झाला असावा किंवा त्यांची चमक इतकी वाढली असावी की कॅमेरे त्यांना टिपू शकले नाहीत. पण त्याचे पूर्ण गायब होणे, हे आश्चर्यापेक्षा कमी नव्हते.

शास्त्रज्ञांनी काही वेळापूर्वी या ताऱ्यांचे छायाचित्र नोंदवले नसते तर ती कदाचित क्षणभर चूकही मानली गेली असती. मात्र अशाप्रकारे अचानक तारे अदृश्य झाल्याने यासंदर्भात नंतरच्या काळात अनेक युक्तिवाद झाले. त्यात ताऱ्यांची चमक अचानक मंदावण्याच्या शक्यतेसह काही धूलिकणांच्या छटा छायाचित्रात उमटण्याच्या शक्यताही व्यक्त झाल्या.

त्यावर पुढील काळात चाचण्या घेण्यात आल्या. मात्र अशा प्रकारे तारे अदृश्य होण्यामागील कारण त्यातूनही स्पष्ट होऊ शकले नसल्याने यामागे आणखी कोणती कारणे असू शकतात, याचा खगोल शास्त्रज्ञ अजूनही शोध घेत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Marathi News

Recent Posts