२ जानेवारी २०२५ भंडारदरा : पर्यटकांची गड, किल्ले सर करण्यास पसंती यंदा नवीन वर्षाचे स्वागत गड, किल्ले सर करण्यास काही पर्यटकांनी पसंती दिल्याचे दिसून आले.आशिया खंडातील सर्वात खोल दरी म्हणून संबोधला जाणाऱ्या सांदण दरीला काहीशा प्रमाणात पर्यटकांनी पसंती दिली.
तर महाराष्ट्राच्या एव्हरेस्टवर पर्यटकांनी चढाई करण्यास अनेक पर्यटक दिसून आले. तरी सुद्धा भंडारदऱ्याला आलेल्या पर्यटकांना परिसरातील व्यवसायकांनी सुंदर सेवा दिली.अनेक कॅम्पिंगच्या ठिकाणी पर्यटकांसाठी आदिवासी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.लव्हाळवाडी येथील आदिवासी बांधवांचे नृत्य पर्यटकांच्या मनात घर करताना दिसून आले.
मागील वर्षाला गुडबाय करीत नवीन वर्षाचे भंडारदऱ्याला अनेक पर्यटकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. यावेळी धरणाच्या काठावर लागलेल्या कापडी तंबुच्या सहवासातला आनंद उपभोगत शेकडो पर्यटकांनी काल बुधवारी आदिवासी बांधवांच्या बरोबर नृत्यात सहभाग नोंदविला.
अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे निसर्ग नगरी समजली जाते. या निसर्ग नगरीत दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटक दाखल होत असतात. भंडारदरा धरणाच्या काठावर पर्यटकांच्या स्वागतासाठी हजारो टेन्ट लावून त्यांच्या निवासाची सोय अनेक कॅम्प धारक करीत असतात. या कॅम्प साईडवरच जेवणापासून ते राहण्यापर्यंत व्यवस्था केली जाते.
यंदा थर्टी फर्स्टसाठी शनिवार, रविवार जोडून न आल्याने अनेक पर्यटकांना भंडारदऱ्याला येता आले नाही. त्यामुळे यंदाच्या थर्टी फर्स्टला पर्यटकांची संख्या रोडावलेली दिसून आली.भंडारदरा धरणाच्या काठावर काहीशा प्रमाणात पर्यटकांचे जथ्थे सोडता अभयारण्यात पर्यटक फिरकले नाही. त्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी केलेली थर्टी फर्स्टची जय्यत तयारी काहीशी निराशा जनकच ठरली.
काल रात्री बारा वाजता भंडारदऱ्याचे अभयारण्य सोडता बाकी ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. या पर्यटनाला कुठेही गालबोट लागू नये, यासाठी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय चोख बंदोबस्त बजावला.
तर कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांचे पोलीस विभागाला सहकार्य मिळाले.
भंडारदऱ्याला गर्दी होणार याची जाणीव असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना सुचनेनुसार कल्पना देण्यात आल्या होत्या.भंडारदऱ्याच्या प्रत्येक टेन्ट साईडवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून होते.अगदी शांततेत पर्यटकांनी कोणतेही गालबोट न लागता नविन वर्षाचे स्वागत केले असे राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांनी सांगितले.
भंडारदरा अभयारण्य क्षेत्रात यावर्षी नविन वर्षाचे स्वागत अगदी शांततेत व आनंदाने पर्यटकांनी करत निसर्ग पर्यटनाचा आनंद घेतला.अभयारण्यात व इतर क्षेत्रात कुठेही पर्यटनाला गालबोट लागले नाही असे वन्यजीव (नाशिक) सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.