शौक म्हणून किंवा घामाचा दुर्गंध घालवण्यासाठी सेंट वापरत असाल तर जरा जपून तो विकत घ्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कंपन्यांच्या सेंटच्या बाटल्यांमध्ये प्राण्यांचे मूत्र वापरण्याचा गोरखधंदा सुरू झाला आहे. लंडन पोलिसांनी या टोळीचा माग काढायला सुरुवात केली आहे.
सेंटबाबत विकत घेणाऱ्यांपैकी अनेकांना फारशी माहिती नसते. गंध आवडला नि बाटली विकत घेतली, असे अनेकजण करतात. काहीजण फक्त ब्रँड पाहून खरेदी करतात. बनावट सेंट तयार करणाऱ्या टोळ्यांनी अशा सेंटमध्ये प्राण्यांचे मूत्र वापरण्यास सुरुवात केली आहे.
सेंटचा रंग पिवळा होण्यासाठी या मुत्राची मदत मिळते, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी टॅमर बाकिनर यांनी सांगितले. अशा सेंटमुळे त्वचेचे आजार जडतात. याशिवाय इतर आजार जडण्याची शक्यता दाट असते.
अशाच प्रकारे ब्रॅण्डेड कंपन्यांचे गॉगल बनावट कंपन्या विकतात. ग्राहकांच्या डोळ्यांची सूर्याच्या अति नील किरणांपासून सुरक्षा व्हावी, यासाठी बॅण्डेड कंपन्यांकडून गॉगलसाठी तशा प्रकारची काच वापरली जाते. परंतु या बनावट कंपन्या फक्त मोठ्या कंपन्यांचे नाव वापरुन ग्राहकांच्या डोळ्यांशी खेळतात.