पुणे : लॉकडाऊनमुळे संबंध महाराष्ट्रात परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून आलेले मजूर अडकून पडले. या मजुरांनी घरी जाण्यासाठी पायी जाण्याचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर शासनाने श्रमिकांना परराज्यात पाठवण्यासाठी विशेष रेल्वेची सोय केली.
शासनाने यातील नियमावलीत आणखीन सुधारणा करत संबंधित राज्याची पूर्वपरवानगी घेण्याचा मुद्दा कॅन्सल केला आहे. त्यामुळे आता पुण्यात अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी दररोज ११ रेल्वे गाडय़ा सोडण्यात येतील,
अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. कोरोनच्या सद्य:स्थितीबाबत पत्रकारांना दूरचित्रसंवादाद्वारे जिल्हाधिकारी राम यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, ‘शहरासह जिल्ह्य़ात अडकलेल्या तब्बल १.२१ लाख श्रमिकांनी स्वगृही परतण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. मात्र, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि झारखंड या पाच राज्यांकडे रेल्वे गाडय़ांचे १०३ प्रस्ताव प्रलंबित होते.
या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याशिवाय संबंधितांना स्वगृही पाठवता येत नव्हते.मात्र, केंद्र सरकारने संबंधित राज्यांची पूर्वपरवानगी घेण्याची अट शिथिल केली आहे.
त्यामुळे पुण्यात अडकलेल्या श्रमिकांना त्यांची घरी पाठवण्यासाठी जास्तीत जास्त रेल्वेगाडय़ा सोडण्यासाठी रेल्वे प्रशासनासोबत नियोजन करण्यात येत आहे.’
इतक्या श्रमिकांनी केले अर्ज श्रमिकांना स्वगृही जाण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. त्यानुसार शहरासह जिल्ह्य़ातून आतापर्यंत एक लाख २१ हजार श्रमिकांनी स्वगृही जाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. त्यानुसार परराज्यातील श्रमिकांची पाठवणी करण्यासाठी संबंधित राज्यांकडे प्रस्ताव पाठवले होते.