अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतरच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राजकारणात वादळ उठवून देणारा मोठा ट्विस्ट मंगळवारी (१६ मार्च) बघायला मिळणार आहे. जिल्हा बँकेचे संचालक व अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर हे माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांना रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
गायकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार :- मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात अगस्ती कारखान्याचे विद्यमान सात संचालक, बाजार समिती व काही संस्थाचे पदााधिकारीही गायकर सोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. कोविड संसर्ग कमी झाल्यावर अकोल्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून त्यात गायकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
पिचड यांच्या राजकारणावर परिणाम :- हा पक्ष प्रवेश जिल्हा बँक निवडणुकीनंतर लगेच घेण्याची गळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घातली होती. पण अगस्ती कारखान्याचा गाळप हंगामावर याचा विपरित परिणाम होऊ नये म्हणून गायकर यांनी हा प्रवेश एक महिन्यापासून लांबणीवर टाकला. मात्र, २५ एप्रिलला अगस्तीच्या गाळप हंगामाचा पट्टा पडणार आहे. त्यामुळे आता हा प्रवेश होणार आहे.
अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर यांच्यासह ८ संचालक प्रवेश करणार आहेत. या राजकीय ट्विस्टचा परिणाम भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्या राजकारणावर होणार आहे.तसेच तो अगस्तीच्या राजकारणावरही होणार आहे. अगस्ती कारखाना व्यवस्था परिवर्तनबाबतचा ट्विस्ट असल्याचे मानले जात आहे.
बहुजन समाजाचा चेहरा :- गेली पाच वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेले अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष गायकर हे तालुक्यात बहुजन समाजाचा चेहरा मानले जातात. जिल्हा बँक निवडणुकीत गायकर हेे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे व पिचड समर्थक म्हणून न राहता ते उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत जावून बिनविरोध निवडूनही आले.
मात्र, अनुसूचित जमाती मतदारसंघातील उमेदवार भाजपचे वैभव पिचड यांनाही गायकर सोबत आपणास बिनविरोध निवडून देतील, अशी आशा होती.पण त्यांना आपला अर्ज मागे घ्यावा लागला. राष्ट्रवादीकडून अमित अशोक भांगरे यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड होऊन दमदार एन्ट्री झाली. अकोल्याच्या राजकारणात पहिल्यापासून पिचड यांच्या विरोधात भांगरे घराण्याचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत प्रबळ दावेदार मानले जातात.
पिचड व आमदार लहामटेंना डोकेदुखी :- गत विधानसभा निवडणुकीत एकाच एक उमेदवार रिंगणात उतरवण्यात ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी पुढाकार घेत आमदार डॉ. किरण लहामटे हे विजयी झाले. तेव्हा अमित अशोक भांगरे यांचे वय २५ पूर्ण होत नसल्याने ते उमेदवारी करू शकत नव्हते. जिल्हा बँक संचालक म्हणून भांगरे यांची बिनविरोध निवड ही पिचड व आमदार लहामटेंना डोकेदुखी ठरणार आहे.