Maharashtra News : महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे ( महाज्योती) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) चाळणी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे उघड झाले आहे.
यापूर्वीही महाज्योतीच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचे प्रकार घडले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत पुण्यातील एका परीक्षा केंद्रावर कॉपी झाली होती, तर एमपीएससीच्या परीक्षेत पुण्यात एका नामांकित कोचिंग क्लासेसच्या सराव प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आल्यामुळे ती परीक्षा रद्द करावी लागली होती.
त्या वेळी ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचे काम देण्यात आले होते. ते काढून घेण्यात आले आणि नवीन कंपनीला पुढील काम देण्यात आले.परंतु, नवीन कंपनीने देखील गोंधळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.
आता पुन्हा परीक्षेत एका विद्यार्थ्याला २०० गुणांच्या पेपरमध्ये तब्बल २२० गुण दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाज्योतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. महाज्योतीकडून एमपीएससीसाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचा निकाल लावण्यात आला होता.
परंतु, या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त गुण दिसून येत आहेत. नॉर्मलायझेशन केल्यामुळे हा प्रकार झाल्याचे महाज्योतीने स्पष्ट केले आहे. सुधारित निकाल प्रसिद्ध करताना प्रारूप निकाल प्रसिद्ध करता येईल.
त्यावर विद्यार्थ्यांचे आक्षेप मागवण्यात येतील आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, असे महाज्योतीकडून यावर खुलासा करण्यात आला आहे.