Maharashtra News : कोल्हार- लोणी रोडवर प्रवरेच्या महाविद्यालयानजीक टेम्पोच्या पाठीमागून धडकल्याने दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला. सदर युवक संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील व्हेटर्नरी डॉक्टर असल्याची माहिती प्राप्त झाली.
अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव राहुल रमेश पोकळे (वय ३४), रा. लोहारे, ता. संगमनेर असे आहे. काल शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान कोल्हार- लोणी रोडवर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयानजिक हा अपघात झाला.
रोडवर गतिरोधक होते, त्या ठिकाणी ही घटना घडली. गतिरोधकसमोर दिसल्याने टेम्पो चालकाने ( क्रमांक एम. एच. १५ – डी के ०३३७ ) वेग कमी करीत जागेवर ब्रेक दाबला. त्यामागून दुचाकीवर (क्रमांक एम. एच. १५ सी एफ ५४९४) चाललेला पोकळेची टेम्पोला पाठीमागून जोराची धडक बसली.
प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मयत राहुल पोकळे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या भागात रोडवर गतिरोधक असून येथे वेगाने जाणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक दाबावे लागतात.
या कारणास्तव पाठीमागून धडक बसून येथे वारंवार छोटे-मोठे अपघात घडतात. बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्षच केल्याने स्पिड ब्रेकरवर डॉक्टरांचा भीषण अंत झाल्याने बांधकाम खाते आता तरी जागे होणार का असा प्रश्न या रस्त्यालगतचे रहिवासी करीत आहेत.