MSRTC News : १५ जूनपासून शालेय-महाविद्यालयीन वर्ष सुरू होते. आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी एसटी बसेसचा सर्वात मोठा आधार आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाद्वारे विविध योजनांद्वारे राज्यभरात १२ हजार ६४६ एसटी बसेसच्या फेऱ्या धावतात.
चालूवर्षाचा विचार करता या फेऱ्यांमधून तब्बल ११ लाख विद्यार्थ्यांनी एसटी प्रवास केला आहे. ग्रामीण भागातील टोकापासून शहरापर्यंत शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांची एसटी गेल्या अनेक वर्षांपासून अविरत सेवा बजावत आहे.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना एसटी बस फेऱ्यांचा मुख्य आधार असतो. राज्यातील बहुतांश वाडी, वस्त्या, लहान गावे येथून तालुक्यामध्ये तसेच तालुक्यामधून जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींची वाहतूक एसटी महामंडळाच्या बसेसद्वारे नियमित करण्यात येते.
राज्यातील सर्व २५० आगारांद्वारे तसेच सुमारे ३०३ नियंत्रण केंद्र अशा एकूण ५५३ ठिकाणांवरून विद्यार्थी पासेस वितरीत करण्यात येतात. या व्यतिरिक्त विभाग व आगार स्तरावरील पर्यवेक्षकीय कर्मचारी हे शिक्षण संस्थांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना पासेसचे वितरणदेखील करतात.
सद्यस्थितीत राज्यात एसटीच्या एकूण १२ हजार ६४६ शालेय फेऱ्या धावत आहेत. या फेऱ्यांचे सुमारे ११ लाख विद्यार्थी, विद्यार्थिनी लाभ घेत असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.